Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 1476 articles
Browse latest View live

एक छिद्र उरलेलं

$
0
0

>> प्रशांत असनारे

महाभारतातील ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?

एक गरीब म्हातारा हस्तिनापूरला गेला. काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजाला भेटला. परंतु तो पर्यंत सूर्यास्त झाला होता. त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली.

तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले, 'आता सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे मी आता दान देवू शकत नाही. तू उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये. मी तुला निराश करणार नाही.'

तो गरीब म्हातारा नाराज होवून परत फिरला.

या दोघांमधला संवाद बाजूला बसलेले भीमसेन ऐकत होते. तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीमसेन धर्मराजाला म्हणाले, 'दादा, तुम्ही त्या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिलं आहे. पण एक विचारू ! माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते?'

धर्मराजाला स्वतःची चूक कळली त्यांनी लगेच त्या गरीब म्हाताऱ्याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं.

भीमानं विचारलेला हा प्रश्न छोटासा असला तरी तो अस्वस्थ करणारा आहे. आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो आयुष्याचं खरं महत्त्व कळतं.

''तो काल मला भेटला होता, आज तो नाहीय', 'तो मघाशी माझ्याशी फोनवर बोलला होता, आत्ता तो नाहीय.' असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात.

हा क्षण माझा आहे. पुढचा क्षण माझा नाही, हे एकदा का आपण आपल्या मनात रूजवले की संताप, चीड, द्वेष, मत्सर या सगळ्या बावना आपोआप गळून पडतात आणि हातात राहते सूर ताल, लय, ठेका घेवून आलेलं आयुष्याचं रंगीबेरंगी गाणं!

जी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात, ते गेल्यानंतरही त्यांचे चौकात पुतळे होतात, जे शास्त्रज्ञ, विचारवंत असतात, त्यांचे विचार आपल्याला ते गेल्यानंतरही पुस्तकातून भेटतात. जे कलारंत, गायक, खेळाडू असतात, ते गेल्यानंतरही ते त्यांच्या कलेतून, कृतीतून आपल्याला आठवतात.

पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय? शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण? कुठल्या रूपात मागे उरतो आपण?

माझ्या घरात

आज मी आहे,

उद्या मी नसेन,

माझ्या जागी

एक मिणमिणता दिवा असेल

दहा दिवसांनी तो दिवा विझेल

त्या जागी माझा एक फोटो असेल,

लाकडी चौकट,

कोरीव नक्षीकाम,

हसरा फोटो.

काही दिवसांनी

माझ्या लटकलेल्या फोटोवर

साचलेली धूळ असेल

किंवा त्या फोटोची पातळ काच

वेडीवाकडी तडकलेली असेल

काही वर्षांनी

माझा तो हसरा फोटो

भिंतीवरच्या छिद्रातून

खिळ्यासकट निखळलेला असेल...

आणि मग त्यानंतर

पिढ्यान् पिढ्या

माझ्याच घरात

माझ्या नावाचं

फक्त उरलेलं एक छिद्र असेल !

आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'उत्सवात' करायचं का?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाखमोलाची दवा... पण मोफत

$
0
0

>> बाबा भांड

जगण्याचे साधेसोपे नियम मोडल्याने चाळिशीत माझ्या शरीर-मनाचा खुळखुळा झाला. काही वर्षं योगाभ्यास, आहारनियोजनाने सर्व्हिसिंग केली; पण मध्यंतरात तंट्या भिल्लाच्या लेखनाच्या ध्यासानं यात खंड पडल्यानं बॅटरी उतरली. दुखण्याच्या मूळ पाहुण्यांनी डोकं वर काढलंच. दीर्घ लेखन, सततच्या बैठकीनं बद्धकोष्ठता वाढली. मूळव्याधीनं पाय पसरले. सकाळचं संकट पहाटेपासूनच अस्वस्थ करू लागलं.

एका मित्रानं युरिन थेरपीवरचं 'द वॉटर ऑफ लाइफ' हे पुस्तक वाचायला सांगितलं. तेव्हा दिवंगत माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांची आठवण झाली. स्वमूत्र हे माझ्या उत्तम प्रकृतीचं रहस्य आहे, असे मोरारजीभाई जाहीरपणेच सांगत. स्व-मूत्रावरची इतर पुस्तकं मिळवून वाचली. जगभरात यावर झालेल्या संशोधनाची माहिती इंटरनेटवर मिळवली. कबीरांचा दोहा, आयुर्वेदातील डामरतंत्राचे १०७ श्लोक, बायबल-कुराणातले स्व-मूत्रोपचारातले प्राचीन संदर्भ समोर आले.

एका सकाळी ताज्या मूत्राचा एकच प्याला घेऊन सुरू केलं. मूत्रात कापूस भिजवून मूळव्याधीवर लावला. थोड्या वेळात चमत्कारासारख्या वेदना थांबल्या. आठवड्यात मूळव्याधीतून सुटका झाली आणि मग अनेक आजारांवर स्व-मूत्रोपचाराचा उपयोग मित्रमंडळींवर सुरू केला. चांगले रिझल्ट मिळू लागल्याने उत्साह वाढला; मित्र टिंगल करू लागले. मात्र, मानवी मूत्र हे शरीर व मनाच्या उत्तम आरोग्यरक्षणाची गुरुकिल्लीच माझ्या हाती आली होती.

एक मित्र मला म्हणाला, 'मानवी मूत्र हे शेतीसाठी उत्तम खत आणि कीटकनाशक आहे.' अनुभव हीच खात्री. म्हणून मग परसबाग अन् शेतावर प्रयोग सुरू केले. उत्तम रिझल्ट दिसू लागला. मानवी मूत्र ही निसर्गाने निर्माण केलेली संजीवनीच मला सापडली. वाटू लागले की माणसाच्या सर्व आजारांवर रामबाण औषध आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्याचा मोठा खर्च खत-कीटकनाशकांवर होतो. मातीची सुपीकता टिकविण्यासाठी उत्तम खत, पिकाची गुणवत्तावाढीसाठी तसेच कीटकनाशक म्हणूनही मानवी मूत्र हे वरदान ठरू शकते.

माणूस दिवसाला दीड-दोन लिटर मूत्र शरीराबाहेर टाकतो. महाराष्ट्रातील बारा कोटी माणसांचे मूत्र साठवले तर, या पर्यायी खतातून आणि कीटकनाशकांच्या उत्पादनातून औद्योगिक क्रांती होईल; शेतीचा पोतही सुधारेल. महाराष्ट्रात एका वर्षात दोन हजार पाचशे कोटी रुपयांचे ३५ लक्ष मेट्रिक टन रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर केला जातो. मानवी मूत्राचा खतासाठी उपयोग करण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या राज्यप्रशासकाची गरज आहे.

ताजे मूत्र मानवाच्या आरोग्यरक्षणाचे काम करते, तर शिळ्या मूत्रापासून जमिनीचा पोत राखत खत आणि कीटकनाशक म्हणून मदत होऊ शकते. दूध संकलनासारखं, मूत्रसंकलन करून त्याची उपयुक्तता सामान्य जनतेला पटवून देणं, रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशकाच्या किमतीपेक्षा स्वस्त दरात हे खत देणे शक्य होईल. शेतीच्या खर्चात बचत होऊन उत्पन्नात मात्र भरघोस वाढ होऊ शकेल. मात्र, या व्यवसायातील हितसंबंधियांचा-विरोधकांचा विरोध मोडून काढून, हजारो वर्षांपासून निसर्गाने माणसास दिलेल्या या अदृश्य भांडवलाचं रूपांतर पारंपरिक ज्ञानउद्योगात करण्याची फार आवश्यकता आहे. गरज आहे, दूरद्रष्ट्या उद्योजकांची तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाठिशी उभे राहणाऱ्या प्रशासकाची.

संत कबीर अमरी म्हणजे स्व-मूत्रासंबंधी म्हणतात,

काया अमरी नासै रोग।

पाकी अमरी साधै योग।

कहे कबीर अमर भाई काया। जिन भेद अमरी का पाया।

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थित्यंतराचा क्रांतिकाळ

$
0
0

>>दिनकर गांगल

तीस-पस्तीस वर्षांपूर्वी एक फ्रेंच चित्रपट पाहिला होता. त्या काळात बहुतेक चित्रपटांना दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी असे. युद्धाचे शेवटचे दिवस. एक फ्रेंच सैनिक गावी सुटीवर परतत असताना संध्याकाळी रस्ता चुकतो व दुसऱ्याच गावातील एकाकी फार्म हाऊसवर पोचतो. तेथील गृहिणी तिच्या युद्धावर गेलेल्या नवऱ्याची वाट पाहत असते. ती आगंतुकाचे स्वागत करते, त्याला जेवायला वाढते, रात्री मुक्काम करून सकाळी तुमचे गाव गाठा असे सुचवते. बोलणे जवळजवळ नाहीच, त्यांतीलसुद्धा निवडक संभाषण सबटायटलमधून पोचत असतात.

चित्रपट पुढे नाट्यमय वळण घेतो. वरच्या मजल्यावर झोपलेली गृहिणी व तो अपरिचित सैनिक आकर्षणाने रात्री एकत्र येतात. ते त्यांच्या नकळत सहज घडते. प्रेमाचे संवाद नाहीत की तत्सम सूचक संकेत नाहीत. केवळ शारीरभाषेमधून दोघांची अनावर ओढ कळते. मात्र, त्यात वखवख नाही. सैनिक सकाळी उठून मार्गस्थ होतो. गृहिणी तिचा नवरा लढाईवरून केव्हा येईल, याची वाट पाहू लागते. चित्रपट पाहताच प्रेक्षकाला प्रथम मूक बनायला होते. मग तो मनाला अस्वस्थ करून छळत राहतो. हा काय युद्धाचा विचित्र अनुभव! तो व्यक्तिगत पातळीवर जीवनाची डोक्यातील घडी बिघडवून टाकतो आणि सामाजिक पातळीवर नीतिमूल्यांचे प्रश्न निर्माण करतो. दुसऱ्या महायुद्धाने मानवाची जीवनविषयक जाणीवच बदलून टाकली. वेगवेगळ्या विचारांचे आग्रह वाढले, ते इतके कडवे झाले, की त्यास शीतयुद्धच म्हणू लागले! ठिकठिकाणच्या अस्मिता तीव्र होत गेल्या. स्थानिक इच्छा-आकांक्षा प्रबळ झाल्या. तशा संघर्षांना तत्त्वाग्रहाच्या वातावरणात जागतिक परिमाण मिळू लागले.

तसा त्याहून अधिक भेदक चित्रपट, त्यानंतर काही वर्षांनी आशियाई महोत्सवात दिसला. तो श्रीलंकेचा होता. चित्रपटात एका खेड्याची कहाणी आहे. जाफना प्रांतात तमिळी बंडखोर नेता 'एलटीटीइ'च्या प्रभाकरनचा जोर होता, त्यामुळे तेथे श्रीलंकेचे सैन्य सतत खडे असे. तशी परिस्थिती दहा वर्षे होती. ते खेडे तशा परिस्थितीत दहा वर्षांत सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्या उद‍्ध्वस्त होत गेले. प्रभाकरन मरतो. तमिळी लोकांची चळवळ संपते, पण खेड्यातील सैनिकांच्या अस्तित्वाने बोकाळलेली अनैतिकता व त्यांमधून गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेले संशयाचे वातावरण... दृश्ये, प्रसंग आठवले तरी अंगावर काटा येतो. 'यादवी' ही संज्ञा सरावाने सरधोपट वापरली जाते, परंतु कृष्ण-बलरामांमध्ये संशय निर्माण झाला व त्यानंतर यादवांत परस्परांत लाथाळी होऊन सारा यादववंश संपुष्टात आला, तशा या हकीगती समोर घडत असलेल्या आणि त्या विविध, विशेषत: चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून आपल्यापर्यंत पोचलेल्या. आठ-दहा हजार वर्षांची मानवी संस्कृती उभी केलेल्या माणसाचेच हे अध:पतन!

नीतिसंकेत कालसापेक्ष असतात हे खरे, परंतु गेल्या शतकात विविध कारणांनी होत गेलेली मानवी नीतिमत्तेची पडझड सावरणे माणसाला जमलेले नाही. युनोची स्थापना झाली. प्रथम हिटलर व मग स्टालिन यांच्या दुष्कृत्यांविरुद्ध जग एकवटले. युनोच्याच शैक्षणिक, सांस्कृतिक अनेक संस्था निघाल्या. त्यांचे तऱ्हतऱ्हेचे इंडेक्स आले, शांतता व सुव्यवस्था प्रस्थापण्याचे शेकडो प्रयत्न झाले, शांततेसाठीसुद्धा युनोचे सैन्य उभे राहिले! शास्त्रांच्या प्रगतीने तर टोक गाठले; किंबहुना त्यातून निर्माण झालेल्या तंत्रज्ञानाने स्वायत्त, सार्वभौम रूप प्राप्त केले असून तेच माणसाचे जीवन नियंत्रित करू पाहत आहे. यापुढे माणूस माणसाशी लढेल का? ते माहीत नाही, परंतु तो स्वत:शी लढू लागला आहे आणि म्हणून आतून उद‍्ध्वस्त होत आहे. शेतकरी,विद्यार्थ्यांपर्यंतच्या आत्महत्या हे त्याचे आपल्या पातळीवरील एक लक्षण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तया हंसांचे देह कांचनाचे..

$
0
0

>>सुलभा तेरणीकर

आपल्या आयुष्यात कविताशाखांचा विस्तार कसा झाला, ते मला उमगलंच नाही. वेगवेगळ्या माध्यमातून ती माझ्याकडे येत राहिली. अन् माझ्याभोवती पिंगा घालू लागली. शाळेतील पुस्तकांतून, तबकड्यांतून, पडद्यावरून, रंगमंचावरून माझ्यापर्यंत कविता येत राहिली. वेगवेगळ्या भाषांतूनही खुणावित राहिली. रंग, रस, रूप, गंध, छंद, लय, शब्द, नाट्य यांच्या जीवनरसाची लावण्यखणी कविता आयुष्याला वेढून राहिली, हे मात्र खरं. श्रावण महिन्यात घरात कहाण्या ऐकवल्या जायच्या. त्यातल्या 'निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णांची कमळे' या ओळींनी मनात ताल धरला. पुढे स्तोत्रं, आख्यानं ऐकताना, वाचताना त्यातल्या छंदबद्ध कवितांच्या ओळी आवडू लागल्या. त्यामंधला अर्थ फारसा अर्थ कळला नव्हता; पण ओळी मनात रुंजी घालू लागल्या. पाठ होऊ लागल्या.

कामं उरकताना आजी व्यंकटेश स्तोत्र म्हणत असे. त्यातल्या 'पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयांचा खेद' किंवा 'कळ्या देऊनिया कुळ, मग काय विचारावे,' असं काही कानी पडे. ती ते का म्हणत असे, त्याचा अर्थ काय, याचा विचार त्यावेळी केला नव्हता. आता वाटतं, की आपल्या मुलामुलींच्या आयुष्यात, प्रपंचात आलेली वादळं तिनं त्या स्तोत्रांच्या ओळींच्या आधारे पेलली असतील. पूर्वी पाठ केलेलं 'नवग्रह स्तोत्र' आज समोर एक नवी रंगसृष्टी घेऊन उभं राहतं. सूर्य हा जणूकाही आकाशात उमललेलं लालभडक 'जपाकुसुम' म्हणजे जास्वंदीचं फूलच. हिमतुषार आणि कुंदकळ्यांसारखी शुक्राची चांदणी, दही, शंख आणि जणू दुधाच्या धवल सागराच्या वर्णाचा चंद्र हे वर्णन आज मनाला उल्हासित करतं. रघुनाथ पंडितांच्या नलदमयंती स्वयंवराख्यानातल्या 'तया हंसांचे देह कांचनाचे। पक्ष झळकती वीज जशी नाचे।' या ओळीतून त्या सोनेरी पंखांच्या अद्‍भुत पक्ष्याची झलक हुरहूर लावते.

सारी सृष्टी अक्षरबद्ध करणारी कवितेची ओढ मनाला लागली ती नकळत झालेल्या छंदबद्ध काव्यातून. आयुष्याचा भार घ्यायला हा कविता सांभार मदतीस आला. खूप दिलासा देत राहिला. आधार देत राहिला. आदिजननीला 'तव कृपेची नौका करूनी, दुस्तर भवसिंधु उल्लंघुनी, निवृत्तीतटा नेईजे।' अशी घातलेली हाक मराठीतल्या स्तोत्रातून तिच्यापर्यंत जाईल, असा विश्वास वाटतो. 'दर्शनमात्रे मनःकामना' पूर्ण करणाऱ्या गणेशाचं रूप रामदासांच्या आरतीतूनच मनात उतरलं. 'विषेकंठी काळा, त्रिनेत्री ज्वाळा' असलेल्या शंकराला लावण्यसुंदर असं विशेषण रामदासांच्या वचनातून मनोमन पटतं. 'घनःश्याम सुंदरा' या होनाजीच्या भूपाळीतले शब्द 'मुक्तता होऊ पाहे, कमळिणीपासुनी भ्रमरा, पूर्व दिशे मुख धुतले, होतसे नाश तिमिरा' असं म्हणत मला भावसृष्टीतल्या रम्य उषःकालात घेऊन जातात अन् प्रभातीचे एक सुंदर रूप आपल्यासमोर साकारतात.

१५७९साली गोव्यात आलेल्या स्टिफन्सनं 'ख्रिस्त पुराण' लिहिलं ते मराठीत.

त्यानं लिहिलेली मराठी भाषेची प्रशस्ती पाहा -

जैसी पुस्पामाजि पुस्प मोगरी।

कि परिमळां माजि कस्तुरी।

तैसी भाषांमाजि साजिरी। मराठिया।।

हंसाच्या कांचनाच्या देहाची, मोगरी कस्तुरीच्या गंधाची, पौराणगंध ल्यालेली मराठी कविता मनात रुंजी घालत राहते, तिच्या पंक्ती सहजच ओठातून बाहेर पडतात, आणि मुख्य म्हणजे ती मनाला मोठी उभारी देते. जगणं समृद्ध करते. त्यामुळे आयुष्याची ज्योत थोडी उंच जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवराष्ट्राचे सर्जक

$
0
0

>>प्रा. डॉ. यशवंत पाटणे

उद्याचे आशास्थान म्हणून आपण मुलांकडे पाहतो. त्यांचे भले व्हावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. पण मुलांना पालकांविषयी, शाळेविषयी आणि जगाविषयी काय वाटते, हे जाणून घेतले तर हाती मनोरंजक व मार्मिक माहिती लागेल. आंतरराष्ट्रीय बालक वर्षाच्या निमित्ताने, ऑस्ट्रेलियातील रिचर्ड व हेलन एक्सले या दाम्पत्याने, मुलांचे मनोविश्व जाणून घेण्यासाठी प्रश्नावली तयार केली. मुलांच्या उत्तरावर आधारित 'डिअर वर्ल्ड' नावाचे पुस्तक प्रकाशित केले. मुलांची मनोगते जगासमोर मांडली. देश, भाषा, वेष, रंग कोणताही असो, मुले सर्वत्र सारखीच असतात. ती निरागस, कल्पक असतात. मोठी माणसे त्यांना ज्या पद्धतीने गृहित धरतात, ते त्यांना आवडत नाही. त्यांनाही सर्वत्र शांतता, सुबत्ता हवी असते. जगातल्या भ्रष्टाचार, हिंसाचाराला ती जबाबदार नसली तरी त्यांना अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा तिटकारा असतो. त्यांच्याशी काही अपेक्षा असतात.

एका मुलीला गंमत म्हणून प्रश्न विचारला, हे जग चालवायचा अधिकार मुलांना दिला तर तुम्ही काय कराल? तिने गंभीरपणे उत्तर दिले. 'तुम्ही मोठी माणसं एखादी मोठी गोष्ट मिळाली तर ती दुसऱ्याला देता का? त्यात जग? आणि ते आत्ताच का आम्हाला द्यावे वाटते? खरेतर या जगात बिघाड आम्ही नाही, तुम्हीच केलाय... तेव्हा प्रथम तुम्ही सुधारायाला सुरवात करा. जग आपोआप सुधारेल. ते कोणाकडे द्यायची गरज नाही.'

अशी मुले उद्याच्या जगाचे जागरूक नागरिक होऊ शकतात. लहान मुले हा ज्यांच्या आवडीचा व संशोधनाचा विषय होता, त्या माँटेसरी बाईंना मुलांच्या वैफल्याची मुळे कुटुंबव्यवस्थेत व शिक्षणसंस्थेत दिसली. पालकांनी मुलांना पुरेसा वेळ व जगण्याचे बळ दिले पाहिजे. मुलांनी खेळ, नाट्य, संगीत यातून आयुष्याचे धडे गिरविले पाहिजेत, हा त्यांचा आग्रह होता. हातपाय हलविणारी करमणूक आरोग्याला पोषक असते. सध्या शाळकरी मुले मैदानावर रमत नाहीत, मातीत रंगत नाहीत. लेझीमचे डाव खेळत नाहीत. विहिरीत मनसोक्त डुंबत नाहीत. शाळा सुटल्यावर ती आईभोवती घुटमळण्यापेक्षा संगणकाकडे झेपावतात. बाबांच्या मोबाइलवर गेम खेळतात. अशा या वेडापायी कुटुंबातील मायेच्या नात्याकडे पाहण्याची नैसर्गिक संवेदना हरवत चालली आहे.

हा काळाचा महिमा म्हणून कर्ती माणसे दुर्लक्ष करतात. मुलं हा आपल्या लाडाचा, कौतुकाचा विषय असतो. तो चिंतनाचा झाला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक. एकाच गोष्टीत अडकल्याने मुले जीवनातील नैसर्गिक, उत्कट आनंदाला मुकतात. 'गूळ सांडुनि गोडी घ्यावी' असे तुकोबांनी म्हटले आहे. त्याचा 'अर्थ गूळ चाखा, पण गुळाच्या मोहात अडकू नका.' वैज्ञानिक प्रगतीची फळे चाखताना मुले आध्यात्मिक मूल्ये व कौटुंबिक नात्यापासून दुरावली तर त्यांच्या जीवनवृक्षाला गोड फळे कशी धरणार? हे टाळण्यासाठी लेकरांना सुंदर सांस्कृतिक पर्याय दिले पाहिजेत.

पालकांचा मुबलक सहवास व मनमोकळा संवाद मुलांच्या भावनिक व बौद्धिक वाढीसाठी प्रेरक असते. मुले म्हणजे परिणत होणारी उद्याची पिढी. ती राष्ट्राची मौल्यवान संपत्ती. त्यांचे जीवन सुरक्षित, सुखरूप, सामर्थ्यशाली हवे. त्यांच्याकरिता 'एक वेगळी दुनिया' निर्माण केली पाहिजे. असा विचार हिलरी क्लिंटन यांनी 'इट टेक्स अ व्हिलेज' या पुस्तकात मांडला आहे. आपल्या भोवतालचे जीवन व संस्कृती उद‍्ध्वस्त होत असल्याचे पाहून गुरूदेव रवींद्रनाथ यांनी साचेबद्ध शिक्षणपद्धतीला छेद दिला. निसर्गातले रंग, गंध, नाद आणि माणसातील कलाप्रेम, श्रमकौशल्य संगतीला घेऊन शांतिनिकेतन हे सृजनशील चैतन्याचे स्फूर्तिमंदिरे उभारले. अशी मंदिरे गावोगावी उभारली जावीत आणि लेकरांच्या प्रज्ञा-प्रतिभेतून सुंदर नवराष्ट्र घडावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमच्याही खिशात मोर!

$
0
0

>>प्रशांत असनारे

काही दिवसांपूर्वी व्हॉटस्अॅपवर मला एक मेसेज आला होता. 'एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही गाडीवर निघाला आहात आणि जाताना लग्नाच्या वरातीमुळे ट्रॅफिक जाम झाला असेल तर चिडू किंवा संतापू नका. गाडी बंद करून पाच मिनिट त्याच वरातीत मनसोक्त नाचून घ्या. नाहीतरी उशीर होणारच आहे तर वाया जाणारा हा वेळ एन्जॉय करत घालवा. तुम्हालाच बरं वाटेल.'

मला खूप आवडला हा मेसेज. आपल्या आयुष्यात असे चिडण्याचे, वैतागण्याचे किंवा निराशेचे प्रसंग नेहमीच येतात. प्रत्येकजण त्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे, वृत्तीप्रमाणे अशा प्रसंगाना सामोरा जातो. तरीही स्वतःच्या मनाची शांती बिघडवून घेणारे खूप जणं असतात. काही महाभाग तर त्यांच्या आयुष्यात आलेले आनंदाचे प्रसंगही मनमोकळेपणाने उपभोगत नाही.

आपण जगतो ते आयुष्य खडतर असेल, कठीण असेल पण वाईट निश्चितच नाही. आपल्याला आनंद व्हावा, आपला उत्साह वाढावा अशा कित्येक गोष्टी आपल्या अवतीभोवती उभ्या असतात. आपल्या मनाला उभारी मिळावी अशा कितीतरी घटना आपल्या सभोवताली घडत असतात. फक्त आपल्याला त्या गोष्टी टिपता आल्या पाहिजेत. त्या घटना मनात जपता आल्या पाहिजेत आणि मुख्य म्हणजे हवं तेव्हा अशा क्षणांचा पुनर्नुभवही घेता आला पाहिजे.

तुम्हाला बासू चॅटर्जी ह्यांचा 'खट्टा-मीठा' हा चित्रपट आठवतो का? ह्या चित्रपटातल्या सुशिक्षित, मध्यमवर्गीय कुटुंबाला काही कारणानं आपलं राहतं घर सोडून, सामानसुमानासह रस्त्यावर याव लागतं. पण त्यामुळे न डगमगता, निराश न होता, ते कुटुंब उघड्यावर आभाळाच्या छायेत, मोकळ्या हवेत आपला संसार मांडत आणि पूर्वीच्याच उत्साहाने हसतखेळत, आनंदानं जगायला लागतं. चित्रपट म्हणून हे सगळं मांडताना लेखक, दिग्दर्शकानी काही सवलती घेतल्या असल्या तरी ह्यातून मिळणारी प्रेरणा महत्त्वाची आहे.

हे सगळं आपणही, कोणत्याही परिस्थितीत करू शकतो. फक्त आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात आनंद, उत्साह, चैतन्य ह्या भावना जपून ठेवता आल्या पाहिजेत आणि वेळोवेळी मनाचा तो कोपरा उघडून ह्या मौल्यवान गोष्टींनी आसमंत भरून टाकता आला पाहिजे.

माझ्याजवळ, माझ्या खिशात

शिकवलेला एक मोर आहे

कधीमधी उदासलं

किंवा मनावर काळे ढाग दाटून आले.

की हा शिकवलेला मोर

खिशातून आपोआप

बाहेर येतो

देसभर पिसारा फुलवतो

अन् नाचतो

मनसोक्त... मनमुराद

त्याला नाचतांना पाहून

मुसळधार पाऊस पडतो

उदास काळे ढग निघून जातात

अन् माझं मन

पुन्हा शुभ्र होतं... निरभ्र होतं.

एक गंमत सांगू?

असाच एक मनकवडा मोर

तुमच्याही खिशात आहे

फक्त तुम्ही

त्याला नाचणं शिकवायला हवं!

असा शिकवलेला मोर आपल्या खिशात असला की

ऋतू कोणताही असो, आपलं हे

अवघं जगणं आयुष्यभर बेभान

होऊन थुईथुई नाचत राहील, एवढं मात्र नक्की!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निसमाधीतला कृष्णा

$
0
0

>>बाबा भांड

कृष्णा माझा पुतण्या. पाठच्या भावाचा मुलगा. माझ्या मुलाच्या वयाचा. आमचेवडील लहानपणी गेले. कृष्णाच्या वडिलाने शाळा सोडून मला शिकविले. लहानभावामुळे मी शिकलो. शिक्षणामुळेच आजच्या स्थितीला येऊ शकलो. त्यामुळेकृष्णाला शिकण्यासाठी आमच्याकडे शहरात आणलं; पण तो इथं रमला नाही. दोन वर्षानं गावी परत गेला. दहावीनंतर शिकायचं नाही म्हणाला. शेतीबाडीतत्याचं मन रमेना. लग्न करायचं नाही, म्हणाला. लहानपणी एकटाच चिखल मातीच्या मूर्तीत एकान्तात रमायचा. आमच्या शेतात उंबर, पिंपळ अन् लिंब हे तीनही वृक्ष एकत्र उगवले होते. या त्रिगुणीखाली पुढे तो एकान्तात बसू लागला.मध्येच यात्रेला जाई. एकदा आठ दिवसांत चारधाम यात्रा करून आला. त्यानेसमवयस्क मुलांचा गट केला. शेतीबाडीचं काम करा. आई-वडिलांना जपा.भलत्यासलत्या व्यसन अन् मोहामागं लागू नका, असं मित्रांना सांगायचा.

कृष्णाने जाण्याचं ठरविलं. महिनाभर अगोदर विहिरीजवळचा वाळलेला आंबात्याने गड्याच्या मदतीने तोडला. त्रिगुणीखाली लाकडांचा चौकोनी ओटा तयार केला.

रात्री गावात सत्संग घेतला. तो म्हणाला, मी आता यात्रेला चाललो. तुम्हीगुण्यागोविंदानं भगवंताचं नामस्मरण करा. एकी अन् सत्मार्ग सोडू नका. तोपहाटे लवकर उठला. हा दिवस ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीचा दिवस. आईचं दर्शन घेऊन वावरात आला. त्रिगुणीखालील गुरुदेवासमोर बसला. निरोपाचा ५०१ वा अभंग लिहिला. अभंगाच्या वह्या माऊलीसमोर ठेवल्या. स्वत: रचून ठेवलेल्या चितेवर शांत चित्ताने जाऊन बसला. आणि १६ नोव्हेंबर, २००६ रोजी एकादशीला सूर्योदयाला त्याने अग्निसमाधी घेतली. वह्यांमध्ये शेवटचे तीस अभंग अग्निसमाधीचे होते. यातील चरण होते,

अग्निसमाधीचे केले। निमित्तमात्र

मी जसाचा तसा अभंग। कृष्णा म्हणे।।५०१

आजच्या काळातील ही अविश्वसनीय घटना. फारसा न शिकलेला, कोणीही मानवी गुरू न लाभलेला हा पंचविशीतला तरुण. जीवनरहस्याचे तत्त्वज्ञान अभंगातून सांगतो. कृष्णाला कुठून आले हे ज्ञान? त्याला समस्त रहस्ये सांगणारा कोण गुरू भेटला? हे गुह्य आत्मज्ञान अभंगातून कोवळ्या वयात प्रकटले. ह्याचा शोध घेताना लौकिक जीवनातील आजच्या मोजपट्ट्या कचऱ्याच्या पेटीतच टाकाव्या लागतील. आजच्या विज्ञानवादी-बुद्धिवादी आणि भोगवादी युगाला आव्हान ठरेल अशी हीघटना होती. कृष्णाची अग्निसमाधी माझ्यासारख्या आस्तिक-नास्तिक यासीमारेषेवरच्या लेखकासाठी एक आव्हान होतं. देवाधर्माच्या नावानं अन्आध्यात्मिक पीठांतून धंदा करणाऱ्यांची आज सगळीकडे कमतरता नव्हती. ते सगळं पुन्हा कृष्णाच्या अग्निसमाधीस्थळी होऊ नये, ही काका म्हणून माझीजबाबदारी होती.

त्या काळात मी मटका-जुगार अन् वेश्या यावर कादंबरी लिहीत होतो. कृष्णाच्या जाण्याने माझ्यातल्या लेखकाची कोंडी झाली. समाधिस्थळी कर्मकांड अन् बुवाबाजीची दुकानं थाटली. हे करू नका, असे कृष्णाने अभंगात लिहिलेलं. ते प्रकार थांबविताना आम्हाला बराच संघर्ष करावा लागला. मी संतसाहित्य वाचू लागलो. अभ्यासक मित्रांशी चर्चा करू लागलो. कृष्णाचे अभंग हे संतपरंपरेचा एक प्रवाह आहे. ते अभंग आम्ही छापले. कृष्णावर माझी 'योगी' ही कादंबरी, चरित्र, अभंगावर समीक्षा, ओवीबद्ध चरित्र अशी लहान-मोठी पंधरा पुस्तकं आली. अग्निसमाधीस्थळास शासनाची तीर्थक्षेत्र मान्यता, त्यांच्या अभंगावर एक विद्यार्थी पीएच.डी. करतोय. या संशोधनातून हे अभंग सर्वदूर पोहोचत आहेत.

कृष्णा महाराजांनी जाताना लिहिले,

मागे ठेविले अभंग। स्वानुभवाचे निरोप

तुम्ही त्याचे रोप। वाढी लावा।।

ही अपेक्षा केली. ते काम करण्याचा आनंद आम्ही घेत आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तिभाव

$
0
0

>>दिनकर गांगल

भक्तिभाव या जोडशब्दाची सामासिक फोड भक्तीचा भाव, भक्ती आणि भाव अशी तऱ्हतऱ्हेने करता येईल, पण तो शब्द उच्चारला अथवा गाण्यात वगैरे ऐकला गेला, की मन पावित्र्य, आनंद, समाधान अशा भावभावनांनी तृप्त होते. त्या पाठीमागे पुराणकथा, संतांचे श्लोक-अभंग अशी परंपरा असते.

भक्ती आणि भाव या शब्दांचे कोशातील अर्थ प्रमाणित आहेत, परंतु ते वास्तवात सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीनुसार बदलत गेले आहेत, कारण माणसाचे देवदेवतांबरोबरचे संबंध काळाबरोबर पालटत गेलेले आहेत. देवांचे चलनदेखील बदलत गेले आहे. साईबाबा यांना देवतारूप गेल्या तीस-चाळीस वर्षांत लाभले आहे, त्याआधी संतोषीमाता ही लोकांना प्रिय होती. दत्तसंप्रदायही सध्या चलनात आहे. गणपतीचे सिद्धिविनायक, वरदविनायक, अष्टविनायक असे ब्रँड अनेक असले व त्यांच्याही तिरुपतीप्रमाणे फ्रँचायजी असल्या तरी गणेश देवतेची पूजा घरोघरी मनोभावे केली जाते. तेच शिवशंकराचे. परंतु विष्णू मात्र त्याच्या अवताररूपांत लोकांना अधिक भिडतो. मारुती बलोपासनेसाठी एकेकाळी पूजला जाई. तो शनिवार महात्म्यापुरता उरला आहे. तुलनेने देवींचे महात्म्य सततचे असत नाही; तेथेही लिंगभेदभाव! ते नवरात्रात अपार असते. एरवी, ते व्रत-नवस अशा स्वरूपात व्यक्त होते. नवी लग्ने झालेली जोडपी मात्र आवर्जून त्यांच्या त्यांच्या देवींची खणानारळाने ओटी भरतात.

असा सगळा पसारा पाहिला, की त्यात भक्तिभाव जाणवत नाही. मुख्यत: आहे ते कर्मकांड अथवा नवससायास. एकेकाळी देवांशी नाते 'क्विड प्रो क्वो' असे. म्हणजे मी तुला नमस्कार करतो, तू मला पास कर - नोकरी दे - माझे लग्न जुळव वगैरे. काही मंडळी त्याचा अर्थ लाच देण्याघेण्याचा आरंभ देवापासून होतो असा लावतात. मात्र, आता लोक अपेक्षा ठेवून देवळात जाताना दिसत नाहीत, त्यांचे ते स्वान्त असतात. समाजातील बऱ्याच मोठ्या वर्गाला सुखस्वास्थ्य आले आहे. त्यांच्या भौतिक गरजा देवाच्या आशीर्वादाशिवाय भागू शकतात. तरी माणसांना इतर अनेक तऱ्हांचे दु:ख-क्लेश असतातच. त्यांच्या त्या सुखदु:खात ते देवाला समाविष्ट करून घेतात - जणू काही तो त्यांचा मित्र आहे-सखा आहे.

मी बऱ्याच, विशेषत: गणपतीच्या, मारुतीच्या व शंकराच्या देवळांमध्ये निरखले आहे, की लोक तेथे येतात ते संवाद साधण्यासाठी. ते उंदराच्या कानात बोलतील, नंदीशी हितगुज करतील, चवड्यांवर नाचत काहीतरी पुटपुटतील, साष्टांग नमस्कार घालून त्यांचेच दु:ख (वा आनंद) हलके करतील (वा द्विगुणित करतील). मला ती लोकांची भाविकता वाटते - त्यांच्या भावजीवनाचा भाग.

भाविकता ही भावना विशाल आहे. भक्ती हे तिचे एक टोक आहे. भक्ती हा ध्यास असतो. त्यामुळे ती अंधश्रद्धा असू शकते, परंतु भाविकतेमध्ये अंधश्रद्धा नाही. ते निखळ प्रेम आहे. भाविक माणसांत चांगुलपणा असतो. देव भावाचा भुकेला असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा भाविक त्या मनोवस्थेत असतो व त्याच्या मनी भलेपणाचे सारे गुण प्रकटतात. मात्र, भाविकतेतही बधिरता येऊ शकते.

माणसांचे व समाजाचे देवाबरोबरचे नाते हा समाजशास्त्रीय अभ्यासाचा विषय झाला पाहिजे, पण ते श्रद्धा-अंधश्रद्धा अशा तराजूत मोजले जाते. विठोबाकडे दिंड्या घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांपेक्षा अगदी वेगळ्या तऱ्हेने पदभ्रमण करत भाविक साईबाबांकडे जात असतात. वर्षभर ती मंडळी पथका पथकांनी झपाझप पावले टाकत शिर्डीकडे निघालेली दिसतात. त्यांत तरुण-तरुणींचा भरणा असतो. साईमंदिर हे त्यांचे 'डेस्टिनेशन', पण प्रवास असतो तो एकाच वेळी स्वत:त डोकावण्याचा आणि जगाचे भले चिंतण्याचा. वारकऱ्यांच्या परंपरेची रुढी होत आहे, अशा काळात साईदिंड्या आजचे भावजीवन व्यक्त करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहस्रनामाचे रूपडे

$
0
0

>> सुलभा तेरणीकर

'नावात काय आहे,' हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. खरंतर भारतात हा प्रश्न किंवा त्याचं उत्तर विचारण्याची गरजच नाही. आपल्याकडं नावांबाबत जितकं वैविध्य आहे, तितकं अन्यत्र क्वचितच असेल. बाळाचं बारसं असो की वास्तू, रस्ते, चौक, व्यवसाय, संस्था यांना नाव देण्यासाठी त्यांचा उत्साह भरभरून वाहतो. इथला निसर्ग, साहित्य, संगीत, कला, संस्कृती, माणसं, गावं यांच्या सुंदर नावांची साखळीच गुंफलेली आहे. आपल्या रूपागुणांनी, कर्तृत्त्वानं काही नावं तळपत राहिली आहेत.

संस्कृतमध्येच नव्हे, तर भारतीय भाषांमध्ये तर नावाच्या खाणी आहेत. कल्पक, सूचक, समर्पक, नादमधुर, अर्थवाही आणि विविध नावं देण्यात भारतीयांचा हात कोणी धरणार नाही.

शांतिनिकेतनमध्ये फुललेल्या पुष्पवृक्षाचं नाव गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या माळ्याला विचारलं. तो माळी मराठी असल्यानं त्यानं, 'ते पाडळीचं फूल आहे,' असं सांगितलं. गुरुदेवांनी त्याचं नामाभिधान बंगालीत 'पारुल' असं केलं आणि बंगाली मुलींना एक सुंदर नाव मिळालं. दुधाळ रंगाच्या, मत्त गंधाच्या बुचाच्या फुलांना हिंदीत आकाशनीम म्हणतात. इंदिरा संतांनी त्याला 'गगन मोगरा' या सार्थ नावानं गौरवलं आहे. आकाशाला भिडलेल्या या झाडाची फुलं तोडता येत नाहीत. खाली पडलेली वेचावी लागतात. म्हणून तो खरा गगन मोगरा!

मराठीतील 'अबोली' ही कर्नाटकात 'कनकांबरा' या नादमय नावानं रुणझुणते आणि अबोला सोडते. संस्कृतात गुलाबाला 'तरुणी' हे नाव आहे. बहुधा त्या वेळी युवती लाजत असाव्यात आणि गाल आरक्त होत असावेत. देखणा, नितळ कांतीचा वृक्ष पाहून कुंतीनं आपल्या तशाच सुंदर मुलाला अर्जुन हे नाव दिलं, असं म्हणतात.

संस्कृतात सूर्याला बारा नावं मिळाली आहेत, तर गंगा नदीला चांगली सत्तावीस. प्रत्येक नावातली अर्थच्छटा वैशिष्ट्यपूर्ण आहे. 'रवि' म्हणजे रस निर्माण करणारा. 'सूर्य' म्हणजे शोभायमान. किरणयुक्त म्हणून 'मरीचिमालि'. पृथ्वीची कितीतरी नावं. वसुंधरा, धरती, अवनी, उर्वी, रसा, पृथा; पण ज्यानं तिला 'सागरमेखला' म्हटलं, त्यानं तिचं भव्य, विराट समुद्राचा कमरपट्टा घातलेलं रूप पाहिलं असणार; नाही का? रात्रीसाठी किती सूचक नावं - शर्वरी, विभावरी, कलापिनी, यामिनी... भारतीय संगीतातल्या रागरागिण्या तर अशा, की समोर लावण्यवतीच उभ्या ठाकाव्यात. 'नीलांबरी', 'विहागिनी', 'कृष्णमंजिरी'... ऋतूंशी, प्रहराशी जोडलेल्या त्या जणू कुणी विरहिणी, प्रणयिनी असाव्यात!

आमची कालगणना म्हणजे एक सुरेल लयबद्ध गीतच. दिवस, रात्र, प्रहर, घटी, पळे, संवत्सर यांना सुंदर नावं मिळाली आहेत. इथं रोजचा दिवस नामरूपाची ओळख घेऊन उजाडतो. जया, विजया, मोक्षदा, कामदा एकादशी, नागपंचमी, रंगपंचमी, ज्ञानपंचमी अवतरतात.

कालचक्राचा अचूक अभ्यास करणारे पूर्वज कविहृदयाचेही असण्याची शक्यता आहे. वैशाखात सर्व सृष्टी तप्त झळांनी जळत असताना तृतीयेच्या दिवसाला त्यांनी 'अक्षय' म्हणावं -

वाटसरू, पांथस्थ, प्राणी, पक्षी यांना पाणी द्यावं असा संदेश द्यावा, याचं कौतुक वाटतं.

जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी भरून राहिलेल्या परमेश्वराची नावं तर अनंत आहेत. संतांनी त्या सहस्रनामाचं रूप हृदयस्थ परमेश्वरात पाहिलं. भवसागर तरून जाण्यासाठी त्याचा आधार घ्यावा, असं तळमळीनं सांगितलं. त्या एका नावानं जीवन सोपं करून टाकलं. सुंदरही केलं आणि अर्थपूर्णही!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साक्षात्कार आणि आनंदाचे तरंग

$
0
0

>> प्रा. डॉ. यशवंत पाटणे

एखादी व्यक्ती काही विलक्षण बोलू लागली तर आपण म्हणतो, 'काय, साक्षात्कार झाला काय?' साक्षात्कार या शब्दामध्ये गूढभाव लपला आहे. या शब्दाचा प्रवास 'साक्षर' शब्दापासून सुरू होतो. साक्षर म्हणजे शिकलेला. साक्षात् म्हणजे प्रत्यक्ष समोर आणि साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान अनुभव. अनुभवामध्ये आत्मप्रत्यय असतो. अनुभवातून प्राप्त होणारी अंतस्फूर्ती ही स्वतंत्र व स्वयंभू असते. साक्षात्कार हा उत्कट ज्ञानानुभव आहे. काही लोक साक्षात्काराला दैवी चमत्कार किंवा गूढविद्या समजतात. या विषयाचे गाढे अभ्यासक व संशोधक गुरूदेव रा. द. रानडे यांच्या मते, साक्षात्कार ही गूढ विद्या नाही. तो एक प्रकट अनुभव आहे. आत्मप्रत्यय ही त्या अनुभवाची सर्वश्रेष्ठ कसोटी आहे. त्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. शास्त्रात जशी एखादी कल्पना गृहित कृत्य म्हणून स्वीकारली जाते. त्यानंतर निरीक्षण, परीक्षण व प्रयोग केले जातात आणि शेवटी, गृहित धरलेली कल्पना सत्य ठरली तर तिला सिद्धान्ताचे स्वरूप येते.

परमार्थाच्या प्रांतातील संतांना झालेले साक्षात्कार या पद्धतीने अभ्यासले तर तुकोबांनी साक्षात्कारानंतर म्हटलेल्या 'आनंदाचे डोही आनंद तरंग' या अभंगाचा सहज अर्थबोध होईल. माणूस दैनंदिन जीवनात, कोणत्याही गोष्टीला प्रचीतीशिवाय मान्यता देत नाही. अनुभवाशिवाय प्रचीती येत नाही. रामकृष्ण परमहंस यांनी माणसाला पाहावे तसे परमेश्वराला पाहिले होते. कालीमातेशी ते बोलत. विवेकानंदाना हे सारे गूढ वाटायचे. विज्ञानयुगात असा कोणी परमेश्वराला भेटत असेल, त्याच्याशी बोलत असेल, हे कसे मानायचे?

संत तुकाराम ईश्वरभेटीसाठी व्याकूळ झाले. त्यांना तो प्रयत्नानंतरही भेटत नसल्याने ते वैतागले होते. 'माझ्या लेखी देव मेला। आसे त्याला असेल' असे म्हणत त्यांनी तीव्र नाराजी नोंदविली. गुरूदेव रानडे यांनी तुकोबांच्या या साधक अवस्थेतील संघर्षाचे वर्णन 'द डार्क नाईट ऑफ द सोल' (आत्म्याची अंधारी रात्र) असे केले. तुकोबांच्या जीवनात त्या अंधाऱ्या रात्रीनंतर, जी पहाट उजाडली ती म्हणजे त्यांना झालेले देवाचे दर्शन. त्या दर्शनाने त्यांच्या मनाला आनंदाचे उधाण आले. मुखातून आनंदाच्या अमृतधारा बरसू लागल्या. हा शब्दातील अनुभव व्यक्त करताना ते म्हणतात, 'काय सांगो झाले काहीचिया बाही.' देव पाहायला गेलो अन् देव झालो, ही त्यांची प्रतिक्रिया आहे. गुरूदेव रानडे यांनी आपल्या तत्त्वज्ञानात देव हा शब्द आत्मा या अर्थी वापरला आहे. त्या अर्थाने देवाचे दर्शन म्हणजे आत्मदर्शन. आत्म्याचा अनुभव म्हणजे आत्मज्ञान. आपणास आपण पाहणे हेच आत्मदर्शन होय. अशा अनुभूतीतून मिळणाऱ्या आनंदात बुद्धी, भावना व इच्छा यांचा संयोग झालेला असतो. त्यामुळे साक्षात्कार म्हणजे गूढविद्या नाही. तो अंतःप्रेरणादायी असा इंद्रियातीत प्रत्यक्ष अनुभव असा अनुभव निष्ठेने, भक्तिभावाने साधना केल्यानंतर, विशेषतः ज्ञानभक्तीची परिसीमा गाठल्यानंतर येतो.

तुकोबांची ज्ञानभक्ती व ईश्वरश्रद्धा भाबडी नव्हती. त्यांना साक्षात्कार घडला याचा अर्थ उच्च कोटीचा ज्ञानात्मक असा आनंदलाभ झाला. असा लाभ महावीर व गौतम बुद्ध यांनाही झाला. त्यासाठी त्यांनी उग्र योगसाधना केली होती.

परमज्ञान प्राप्त होईपर्यंत बोधिवृक्षाखालच्या आसनावरून हलायचे नाही, त्वचा सुकली, हाडे गळून पडली तरी चालतील, असा निर्धार भगवान गौतम बुद्धांनी केला होता. अखेर तपसाधना फळाला आली. त्यांना सर्वोत्तम ज्ञानाचा साक्षात्कार झाला. अंतरात दिव्य तेज पसरले. अंतःशक्तीचे साकार रूप म्हणून गौतम बुद्धाकडे पाहिले जाते आणि त्याच दृष्टीने तुकोबांच्या साक्षात्काराकडे पाहिले पाहिजे. आत्मसाक्षात्कार म्हणजे ज्ञानात्मक जाणीव. अशा जाणिवेमुळे जीवनाला संजीवक सामर्थ्याचा प्रत्यय येतो. त्यातूनच सारा देह आनंदाचा डोह होतो अन् तेथे आनंदाचे तरंग उमटतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकू हवा की माउथऑर्गन?

$
0
0

>> प्रशांत असनारे

मध्यंतरी 'वॉर‍-छोड ना यार' नावाचा एक चित्रपट येऊन गेला. भारत-पाकिस्तान या दोन देशांच्या संबंधांवर आणि सीमेवर वारंवार होणाऱ्या चकमकीवर विडंबनात्मक पद्धतीने भाष्य करून प्रेक्षकांना हसवत, युद्ध नको, प्रेम शांती हवी, असा संदेश देणारा हा चित्रपट होता.

सीमेलगत असलेल्या दोन्ही देशांच्या छावण्यांमधले सैनिक एकमेकांसोबत गाण्याच्या भेंड्या खेळतात असा एक धमाल प्रसंग त्या चित्रपटात होता.

दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांवर बंदुकीच्या फैरी करण्याऐवजी सिनेमातली गाणी एकमेकांना ऐकवत आहेत आणि नाचत-गात तसेच हसत आहेत. हे दृष्य पहायला खूपच सुखावह, मनात शांती आणि आनंद निर्माण करणारे होते.

काही मोजक्या लोकांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षामुळे दोन देशांमध्ये वैर निर्माण होते, युद्ध पुकारले जाते आणि सुखी, शांत, समृद्ध आयुष्य जगू पाहणाऱ्या निरपराध सामान्य लोकांची आयुष्ये मात्र उद्‍ध्वस्त होतात.

वैर, शत्रुत्व, हिंसा ह्या विनाशकारी भावना अगदी जागतिक पातळीपासून तर गावखेड्याच्या पातळीपर्यंत सगळीकडे पसरलेल्या आहेत आणि त्यामुळे सामान्य माणसाचं जगणं दु:खमय, खडतर बनलं आहे.

या विनाशकारी विचारांचं, भावनांचं समूळ उच्चाटन करण्याची कोणतीच शक्ती आपल्याजवळ नसली तरी काही आशेचे किरण मात्र आपल्या अवतीभवती आहेत. हे आशेचे किरण म्हणजे संगीत, नृत्य, नाट्य आदी साऱ्या कला.

एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जिथे कुठे गायन, नृत्य किंवा नाट्यकलेचा आविष्कार सुरू असतो. जिथे जमलेल्या प्रेक्षकांच्या मनात त्यावेळेस फक्त एकच भावनेचं आधिक्य असते आणि ती भावना म्हणजे आनंद, सुख आणि मन:शांती.

या कलांच्या सामर्थ्याची काही उदाहरणं म्हणजे एकेकाळी रशियात लोकप्रिय झालेला राजकपूर, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला मायकेल जॅक्सन, जर्मनीतल्या कलाकारांना घेऊन शेकड्यांनी प्रयोग झालेलं 'मृच्छकटिक' आणि अशी बरीच काही उदाहरणं देता येतील.

म्हणून वाटते की संगीतातले स्वर, नृत्याचे पदन्यास आणि नाटकातले जिवंत आविष्कार या कलाच माणसामाणसातलं वैर संपवून या जगाचं नंदनवन बनवू शकतील, असा विश्वास वाटण्यासाठी दोन उदाहरणं पुरेशी आहेत. एरवी भारताचा द्वेष करणारे पाकिस्तानातले नागरिक लता मंगेशकर यांचं गाणं भक्तिभावाने ऐकतात आणि पाकिस्तानातले गझलगायक गुलामअली ह्यांना संगीतातला देव मानणारे लाखो नागरिक भारतात आहेत.

झाली तयारी पूर्ण?

तुझा चाकू कुठाय?

हा असा बोथट का?

नीट धार करून घे-

टेकताच रक्त आलं पाहिजे

तुझं पिस्तुल व्यवस्थित आहे ना?

साफ केलं?

ठीक आहे,

मग आता लोड करून ठेव

तुझा हा बस्तरा असा का?

जुना वाटतोय,

नवीन घे

उगाच रिक्स नको!

आणि...

आणि हे काय!

एवढी जय्यत तयारी सुरू असताना हा कोण मूर्ख माऊथमॉर्गन वाजवतोय?

असे दे! असू दे!

तोही खिशात असू दे

कुणी सांगावं-

कदाचित तोच उपयोगी पडेल!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमचं जगणं हा एक खेळच आहे

$
0
0

>> बाबा भांड

लहान निरागस मुलं खेळताना आपण पाहिलीत काय? खेळताना ती तल्लीन होतात. त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदातून ते दिसतं. ती जिंकण्या-हरण्यासाठी खेळत नसतात; तर खेळण्यातल्या आनंदासाठीच खेळतात. माणसाचं जसं वय वाढतं, तसं निरागसपण हरवून जातं. मी, माझा व्यवसाय, अधिकार, मोठेपणा आणि संपत्ती, अहंकाराचे लेप वाढत जातात. मी बुद्धिवादी आहे. इतरांहून वेगळा आहे. ह्या चौकटी आक्रसत जातात. खेळ म्हटला की, त्याला नियम असतात. त्या चौकटीत खेळायचं असतं. नियम न मोडता खेळावं लागतं. खेळताना प्रत्येक खेळाडू अथवा संघ आनंद ऊर्जेनं खेळत असतो. आपण जिंकावं ही अंतर्मनातली ऊर्मी खेळाला इंधन पुरवित असते. यावरच खेळ रंगतदार होतो. तो खेळ बघणाऱ्या प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. ते क्षणभर स्वत: खेळत असल्याचा अनुभव घेत असतात. अत्युच्च क्षणी सगळ्यांच्या उत्कंठता ताणल्या जातात. श्वास रोखले जातात. यशापयशाचा लंबक हिंदोळत असतो. बघणाऱ्याची अवस्थाही टांगणीला लागते आणि एका क्षणी खेळ संपतो. जल्लोष होतो. हा जल्लोष आनंदाचा असतो आणि त्याच्या पोटात जिंकलेले आणि हरलेल्यांच्या उत्तम खेळाचा भाग असतो. खेळणारे दोन्ही गट आणि प्रेक्षकांनी अंतिम क्षणापर्यंत तो आनंद अनुभवला असतो.

आपलं जगणं हा असाच एक खेळ आहे. जगण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर माणसाला खेळावं लागतं. ती स्पर्धा, अनुभव, अपयश, निराशा, ईर्षा, अडवणूक, प्रतिशह, चढाई या तंत्राने जीवनखेळ सुरू असतो. खेळताना खेळाडू प्रत्येक चाल शंभर टक्के ऊर्जेनं करतो. त्यामुळे यशाच्या जवळपास जाणं होतं. आमचं जगताना तसं होत नाही. मी आणि माझंच घोडं जिंकलं पाहिजे ही गोष्ट आड येते. माझ्यासोबतही आणखी आहेत, ही खेळातली भावना जगताना वितळल्यानं स्वार्थाचा घोळ सुरू होतो.

ते चांगले आहेत, माझ्यावरच अन्याय होतोय. ते बदमाश आहेत, तसं आम्हाला होता येत नाही. कधी कधी आम्ही बिघडलेला समाज अन् गरीब परिस्थितीला वेठीला धरतो. आपल्या जगण्यातल्या अडचणी-अपयशाचं खापर कोणाच्यातरी माथी मारण्याची ही केविलवाणी धडपड असते. आपल्या अपयश, दु:खाची जबाबदारी कुणावर तरी ढकलण्याचा हा प्रकार!

जगणं हा खेळ म्हटलं की, त्याला तोंड देणं हा खिलाडूपणा! जगण्यातील अडचणी, संकटं ह्या परीक्षाच असतात खेळाडूंना प्रतिहल्ला करण्यासाठी. तो क्षण एकदा स्वीकारला की, त्यावर मात करण्याचे बळ मिळत जातं. खेळताना जशी कळत नकळत चूक होते, तसे जगतानाही होऊ शकते. ती ओळखून पुन्हा न होऊ देणं, हा खेळाचा नियम. एक ध्यानात ठेवा, प्रत्येक खेळात तुम्हीच जिंकलं पाहिजे, अशी तुमची जर मनोधारणा होत गेली तर खेळातला आनंदच निघून जाईल. प्रत्येक गोष्ट मला, माझ्या कुटुंबाला, परिवाराला, पक्षालाच मिळाली पाहिजे, हा अघोरी खेळ खेळातला आनंद हिरावून घेतो. उलट मला पुरे आता, ही भावनाही अनेकांच्या जगण्यात आनंदाची फुंकर घालू शकते. जगतानाही सगळं तुमच्या मनासारखंच घडत गेलं, तर ते जगणंही सपक होईल. खेळातला हा नियम ध्यानात ठेवून, आपापला जगण्याचा डाव सावरण्याची ही कला विकसित करावी लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षमता आणि उत्कृष्टता

$
0
0

रामाने त्याच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत राक्षससैन्याला सळो की पळो करून सोडले आणि शेवटी, रावणाचा नि:पात केला. शिवाजीने महाराष्ट्रात मोगल सैन्याची तीच हालत करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. पहिला बाजीराव तर अजिंक्यवीर. त्याच्या लढायांच्या हकीकती जयराज साळगावकर यांच्या पुस्तकात वाचाव्या. पराक्रमांच्या त्या रोमांचक कहाण्या मुलांना कौतुकाने सांगितल्या जातात. व्यावसायिक स्पर्धा हे त्या लढायांचे आजचे रूप. स्पर्धेत साधनशुचिता टिकूच शकत नाही हा समज चुकीचा आहे. स्पर्धेत माणसाचे गुण कसोटीला लागतात. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी स्पर्धात्मक व्यावसायिक जगात गुणवत्ता कशी जोपासली जाते हे सांगत असताना, क्षमता आणि उत्कृष्टता या नव्या मूल्यांची मांडणी केली. शर्मा म्हणाले, की उत्कृष्टता वेगळी असत नाही, ती सततच्या सक्षमतेतून गाठता येते. शर्मा यांच्यासमोर उदाहरण डॉ. वि. ना. श्रीखंडे यांचे होते. त्यांच्या 'रिफ्लेक्शन्स ऑफ ए सर्जन' या पुस्तकानिमित्ताने ते बोलत होते. डॉ. रजत कपूर यांनी त्याच ओघात सांगितले, की श्रीखंडे यांचे जीवन हाच संदेश आहे! श्रीखंडे यांचे '... आणि दोन हात' हे पुस्तक ज्यांनी वाचले आहे त्यांना कपूर यांचे म्हणणे शंभर टक्के पटेल. श्रीखंडे यांनी व्यवसाय-कौशल्याचा मानदंड तयार केला, चांगले अर्थार्जन करून स्वत:चे 'क्लिनिक' उभे केले आणि त्याबरोबर उत्तम जीवनमूल्ये जपली. परंतु एकूण वैद्यकीय व्यवहाराने मात्र लुबाडणूक चालवली असल्याचे चित्र व्यक्त होत आहे. सर्वांच्याच चिंतेचा तो विषय बनला आहे.

डॉ. रवी बापट यांचे पहिले पुस्तक 'वॉर्ड नंबर पाच' काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले तेव्हाही असेच मुद्दे निर्माण होत गेले. बापट शस्त्रक्रियानिपुण, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांनी केइएम हॉस्पिटलचे 'फुल टायमर' म्हणून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला. त्यांचे विद्यार्थी डॉ. योगेंद्र जावडेकर यांनी त्यांना 'वॉर्ड नंबर पाच' नंतर अनावृत पत्र लिहिले. आशय असाः 'तुम्ही तुमच्यानंतरची पिढी संस्कारित केली खरी, आम्ही ते संकेत सांभाळत आहोत. पण आमच्या पुढील पिढीचे काय? रोग्याप्रति आस्था आणि सच्चेपणा हे गुण त्यांच्यात कसे उतरवणार?' जावडेकर पती-पत्नी बदलापूरला रुग्णालय चालवतात. तेथील सामाजिक-सांस्कृतिक जीवनात त्यांचा वावर असतो.

डॉ. अजित फडके यांनी तर 'कॉलनी नर्सिंग होम' व 'पालकर उपचार केंद्र' यांच्या रूपाने खासगी व सार्वजनिक रुग्णसेवेचा नमुना उभा केला. ते अखेरच्या काळातील जाहीर मुलाखतीत म्हणाले होते, 'फॅमिली डॉक्टरांची पद्धत पुन्हा कोणत्या तरी रूपात येईल, अशी आशा मला आहे.' पण त्याच वेळी त्यांच्या बोलण्यातील हताशता सर्वांना जाणवून गेली होती.

ही अशी मंडळी व्यवसाय-नोकऱ्यांत आली तेव्हा जीवनात चुरस शिरली होती, त्यामधून तर त्यांची गुणवत्ता बहरली! तिला जीवनमूल्यांची जोड मिळाली ती कुटुंबांतून आणि परिसरातून. जीवनमूल्यांचीच आज वानवा आहे. राम-शिवाजी-बाजीराव यांच्या कहाण्या श्रवण माध्यमातून पिढ्यानुपिढ्या पाझरत राहिल्या. वर्तमानात श्रीखंडे-बापट-फडके यांच्यासारखी जी 'रोल मॉडेल' आहेत ती लोकांमध्ये रुजणार कशी? पुस्तकवाचनास मर्यादा आहेत. आधुनिक सर्व माध्यमे झटक्यात जगभर संपर्क साधतात व तेवढ्याच झटकन विरून जातात. वर्तमानकाळाच्या या नोंदींना 'डॉक्युमेंटेशन' हा नवा शब्द प्रचलित झाला, ते करण्याची साधने हाती आली, परंतु 'डॉक्युमेंटेशन'चा पुढे उपयोग काय, तो कोणी करायचा आणि कोणासाठी करायचा याचा उलगडा झालेला नसतो. ते 'डॉक्युमेंटेशन'साठी 'डॉक्युमेंटेशन' होते. संस्कारांची व्यवस्था समाजात नाही. त्यामुळे, डॉक्टरांच्याच नव्हे, तर सच्च्या व्यावसायिकांच्या, कलावंतांच्या, कर्तबगार व्यक्तींच्या पुढील पिढ्या 'घड'णार कशा?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुराणकथा आणि इतिहासकथा...

$
0
0

दिनकर गांगल

बरेच लोक विष्णूच्या दहा अवतारांच्या मालिकेत, दोन हजार वर्षांपूर्वीच्या गौतम बुद्धाचा अकरावा अवतार मानतात. काहींना गेल्या शतकातील महात्मा गांधी यांचा बुद्धानंतर त्या मालिकेत समावेश होईल असे वाटते. पहिले दहा अवतार या पुराणकथा तर नंतरचे दोन इतिहासपुरुष; पण सर्वांची धारणा उच्चतम मानवतावादाची. बुद्ध आणि गांधी यांच्या बाबतच्या हकिगती वास्तव माहीत असल्याने चिकित्सेने मांडल्या जातात. त्या दोघांमध्ये महत्त्वाचे साधर्म्य असे, की त्यांनी जसा विचार केला, तसे वर्तन त्यांनी केले. त्यांच्या विचारा-आचारांत कमीत कमी विसंगती होती.

बुद्धाने आत्मा-परमात्मा वगैरे गोष्टी भ्रामक ठरवल्या व ऐहिक जगण्यावर भर दिला. त्याने त्यासाठी अष्टांगयुक्त मार्ग सुचवला. गांधीजींनी विज्ञानमंत्र नाकारला नाही, परंतु आधुनिक विज्ञानाच्या मर्यादा जाणल्या व माणसाच्या आंतरिक बळावर भर दिला. 'मी स्वतंत्र आहे हे मी ठरवणार. ब्रिटिश कोण मला स्वातंत्र्य देणारे?' हे त्यांच्या तोंडचे म्हणून सांगितले जाणारे वाक्य म्हणजे आधुनिक युगाचे सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा उद‍्गार तो! तोच गांधीजींचा द्रष्टेपणा व निर्भयपणा. त्यांनी १९०९ साली लिहिलेल्या 'हिंदस्वराज्य'मधील लेखनाला शब्दश: अर्थ उरलेला नाही, परंतु त्याचा गर्भितार्थ शंभर वर्षांनंतरच्या जीवनास मंत्र पुरवील असाच आहे. तंत्रविज्ञानाने त्यांची खेड्याची आणि ग्रामस्वराज्याची संकल्पना विशाल बनवली आहे. मनुष्या-मनुष्यातील प्रभावी नेटवर्कने सत्प्रवृत्तींचे जाळे विणत गेले तर सर्व अवतारकथा सार्थ ठरतील. त्यातील सत्प्रवृत्तीचा अर्थ एवढाच घ्यायचा, की स्वान्त सुख उपभोगत असताना दुसऱ्याची गैरसोय, त्यास दु:ख होणार नाही हे पाहणे! मात्र येथील मंडळींचे वर्तन विपरीत आहे. एवढे महापुरुष या भूमीत गेल्या दोन-पाच हजार वर्षांत होऊन गेले! परंतु येथील लोकांनी त्यांच्यापासून आचारविचाराचे काही उचलले नाही. उलट, लोकांत दांभिकपणा व भोंदुपणा मात्र भरून गेला आहे. ते विचार एक करतात व वेगळेच वागतात! 'उक्ती तशी कृती', 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' यांसारखी वचने भारतात ठिकठिकाणी आढळतील, परंतु त्यानुसार व्यवहार? छे! छे! जाहिरातशास्त्राने आधुनिक काळात तर त्या विसंगतीस मान्यता दिली व अधिकृतता बहाल केली. टेलिव्हिजनवरील स्वच्छतेची, पांढऱ्याधोप कपड्यांची शोभा आणि कपडे तसे बनवण्यासाठी सुचवलेल्या साबण पावडरी यांचा एकमेकांशी काही ताळमेळ असतो का?

भारतीय तत्त्वज्ञानाने आणि आचारव्यवहाराने तो खोटेपणा जोपासला आहे. रोनाल्ड सेगल यांनी ५० वर्षांपूर्वी 'क्रायसिस ऑफ इंडिया' हे पुस्तक लिहिले. त्यास पार्श्वभूमी चीनच्या भारतावरील हल्ल्याची होती. त्यात त्यांनी भारतीयांच्या खोटेपणावर, भोंदूपणावर, आत्मवंचनेवर अचूक बोट ठेवले आहे. त्याने नेहरू, विनोबा, जयप्रकाश अशा मान्यवरांच्या लेखना-भाषणांतील उतारेच्या उतारे उद‍्धृत केलेले आठवतात. त्यांनी त्यांतील परस्परविरूद्ध आशय; एवढेच काय विधानेदेखील दाखवून दिली आहेत आणि सवाल उपस्थित केला आहे, की या विचारी, बुद्धिमान पुढाऱ्यांना हे म्हणायचे आहे की ते? मग लक्षात येते, की तो दोष भारतीय विचारपद्धतीत असावा. सर्व तर्‍हेच्या जगण्याला येथे आधार आहे. ती उणीव भारतीय संस्कृतीमधील बहुविधतेतून निर्माण झाली असावी का? भारताचा कणा आर्य आणि द्रवीड संस्कृतींमधून घडला. इतिहासक्रमात त्यास बरीच वाकवळणे मिळाली. ते सर्व प्रभाव पचवत, जिरवत, काहींचा त्याग करत भारतीय संस्कृती भरभराटली, नंतर अंधारयुगात तीन-चारशे वर्षे तगून राहिली आणि विज्ञानतंत्रज्ञानाचा प्रभाव आल्यावर पेचात पकडली गेली. त्यामुळे विचार-आचारांत कमालीची विसंगती निर्माण झाली आहे. येथील इतिहासपुरुषांच्याही पुराणकथा होऊन गेल्या आहेत- नुसत्या श्रवण करायच्या आणि विसरून जायच्या!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगणे कर्मकांडापुरते!

$
0
0

>> दिनकर गांगल

भाद्रपद गौरी येतात. जेवतात आणि जातात. त्यामध्ये मोठा 'इव्हेंट' असा काही नाही, पण त्या प्रथेचे पालन घरोघरी निष्ठेने व कसोशीने केले जाते. विशेषत: नैवेद्याचे भोजन. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाची तऱ्हा वेगळी असते. पण एकुणात गौरी सजवणे, त्यांचे भोजन करणे, त्यांना नैवेद्य दाखवणे व स्वत: इष्ट-पाहुण्यांसह जेवणे म्हणजे मोठा आनंद असतो! गंमत अशी, की गौरी येण्याआधी त्यांची जेवढी तयारी व त्यांच्याबाबत जेवढी चर्चा चालते, त्यामानाने गौरी विसर्जनानंतर, काय घडून गेले याबद्दल फार बोललेले ऐकू येत नाही.

गौरी व त्यानंतर महिन्याभरात येणारे दुर्गेचे नवरात्र हे दोन्ही सण विशेषत: मध्यम वयाच्या स्त्रियांना विशेष जिव्हाळ्याचे जाणवतात. स्त्रिया त्या संबंधातील व्रते, उठता-बसतानाचे नियम, तेलवात-माळा असे संकेत जबाबदारीने व कर्तव्यभावनेनेही पार पाडत असतात. असे सण-व्रते-नेम इतर 'मराठी' महिन्यांतही असतात. त्याखेरीज प्रत्येक कुटुंबाचे कुलदैवत, ग्रामदैवत, त्यांचे नैवेद्य अशी परंपरेने आलेली व आपद्धर्म म्हणून स्वीकारलेली बंधने असतात. कोणाच्या घरी गोंधळ असतो तर कोणाच्या घरी बोडण. त्यामधील विधींची कसोशी फार असते.

मला कायम अचंबा वाटतो, की दुसऱ्या घरून आलेली सासुरवाशीण माहेरची व्रते मनात ठेवते आणि सासरची व्रते मन:पूर्वक स्वीकारून कुटुंबसंस्था पुढे नेते त्याचा! या सगळ्यांतून स्त्रीचे मन जेवढे सोशिक बनते, तेवढेच निश्चयी व कर्तव्यकठोरही.

हे संस्कार परंपरेमधून येतात. घराघरांतील अशा प्रथा-परंपरांतून गावरहाटी तयार होते. गावरहाटीस एका बाजूला धार्मिक आधार असला तरी दुसऱ्या बाजूस त्यात नागरी जीवनाचे, सभ्यतेचे संकेत असतात. त्यामधून गावचा समाज चांगल्या जीवनशैलीमध्ये बांधला गेलेला राहतो. पण परंपरांना शाप आहे तो माणसाच्या आळसाचा! बौद्धिक आणि शरीरकष्टांचा आळस. परंपरेचे कालसापेक्ष सौंदर्य, औचित्य जाणून न घेता आचरण केले, की तिची रुढी होते. रुढीमध्ये निर्बुद्धता असते. त्यामुळे रुढीचे कर्मकांड बनते आणि त्यामधून अंधश्रद्धा निर्माण होतात. त्या जाचक बनू शकतात. विशेषत: त्यामधून शोषण होऊ लागते. तेव्हा त्या भेसूर बनतात. मानवतेविरुद्ध असतात.

भारतीय समाज अंधश्रद्धांनी पोखरला गेल्यामुळे भारतीय माणसांच्या मनातील उपक्रमशीलता, विधायकता, आशावाद जवळ जवळ संपून गेला आहे. त्यांचे जीवन कर्मकांडापुरते उरले आहे. कर्मकांडामागील मूळ परंपरांनी भारतीयांना नियमबद्ध व वैभवशाली जीवन दिले होते, परंतु काप गेले आणि भोके उरली, त्याप्रमाणे परंपरांचे वैभव हरवले आणि रुढींचे कर्मकांड उरले.

पूर्ववैभवाचे पोवाडे गाता गाता माणूस अज्ञानाच्या कर्दमात बुडून गेला आहे. त्यातून सुटका करून घेण्यासाठी तो अनिरुद्ध बापूंच्या प्रवचनांत गम्य शोधतो, त्याला अप्पा धर्माधिकारींच्या बैठकांत अर्थ दिसू लागतो, गोंदवल्याच्या रामाची हाक ऐकू येते किंवा शेगावच्या गजानन महाराजांच्या चरित्राची पारायणे सुचू लागतात. पण ती गुंगी आहे. माणसाचा आत्मसन्मान स्वत:चे जगणे स्वत: जगण्यात आहे. तो भारतीय परंपरांचा अर्थ आहे. तो रुढींनी गमावला आहे आणि भारतीय माणूस त्याचे कर्मकांड म्हणजेच त्याची संस्कृती असे समजण्याइतका क्षुल्लक बनून गेला आहे!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोहभरा फूल कमल का...

$
0
0

>> सुलभा तेरणीकर

पुण्याच्या एका प्रशांत उपनगरात निवृत्त आयुष्य व्यतीत करणारे रसिक, संगीतप्रेमी, जाणकार अनंतराव सप्रे मुंबईच्या त्यांच्या पार्ल्याच्या घरातील गाणी, आठवणी इथे घेऊन आले. त्यांच्या मुंबईच्या घरातल्या अनिल विश्वास या उत्सवमूर्ती भोवती जमणाऱ्या कलावंत, रसिकांच्या अविस्मरणीय मैफली, जयकिशनबरोबरच्या 'गेलॉर्ड'च्या टेबलाभोवतीच्या गप्पा, सुधीर फडके, यशवंत देव आणि चित्रपट संगीतावर प्रेम करणारे रसिक यांच्या आठवणींच्या खजिन्यातील एकेक रत्न उदारहस्ते वाटण्यासाठी ते घरातच मोठा आनंदोत्सव करतात. पत्नी उषाताई सर्वांची उठबस करतात. चित्रपटसंगीताचा खजिना या उत्सवासाठी रिता करतात ते मित्रवर्य अविनाश लिमये. गाण्यांचा अफाट संग्रह ऐकण्यासाठी येणारी मंडळी भरपूर रमतात हे जाणून त्यांच्या पत्नी मंगलाताई खानपान व्यवस्था चोख ठेवतात.

मग ही दोन कल्पक आणि संगीतात बुडून गेलेली माणसं अरबी सुरस कथेतील एकेक गोष्टी रचतात. कधी अनिलदा, कधी फक्त लता, कधी लाहोरच्या संगीतकारांची गाणी. अनंतरावांना एकेक गाणं ऐकवताना, त्यावर मार्मिक बोलताना आनंदाचं भरतं येतं. मध्यंतरात उषाताई चविष्ट पदार्थ, चहापान द्यायला सरसावतात. येणारे रसिक तृप्त होतात. 'हसतेस अशी का मनी'पासून लता-सलामत यांच्या लाजवाब युगलगीतापर्यंत खूप ऐकवतात.

कोलकाता, न्यू थिएटर्सच्या 'बंगाल स्कूल'च्या सुमधूर गीतांचा कार्यक्रम केला, तेव्हा मी नव्हते; पण अभ्यासपूर्ण, नेटकं छापील निवेदन आणि गाण्यांची सीडी माझ्या हातावर त्यांनी ठेवली. त्यातलं रोचक आठवणींचं, माहितीचं निवेदन आणि गाणी नितांत श्रवणीय, वाचनीय आहेत. त्यातला हा एक मजेदार किस्सा. गोष्ट १९५१सालातली आहे. स्थळ फर्ग्युसन कॉलेजचं अॅम्फी थिएटर. व्हायोलिनवर बाळ गोठोस्कर आणि हार्मोनियमवर खुद्द अनंतराव होते. एक देखणी कॉलेजकन्या ४३सालच्या 'हॉस्पिटल'मधलं काननदेवींचं गाणं गात होती, 'जरा नैनों से नैना मिलाये जाओ रे'. त्यात ती एक ओळ गद्य म्हणते, 'क्या आओगे ना?' त्या क्षणी तरुण विद्यार्थ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद आला, 'हां हां, क्यों नहीं...' त्यानंतर प्रचंड हास्यकल्लोळात कडक शिस्तीचे प्राचार्य डॉ. दिनकर कर्वेही सामील झाले.

या घटनेला आज साठ वर्षं उलटून गेली आहेत. काळ बदलला. संस्कृतीही बदलली. युवकांची मानसिकताही. खरंतर सैगल, पंकज मलिक, काननदेवी, जगमोहन यांच्या सुवर्णकांचनी स्वरांनी भावुक होणारेदेखील आज जीवनाच्या संधिप्रकाशाच्या छायेत आहेत.

ज्या युगात साबणासारखी वस्तू 'स्लो' होऊ शकते, तिथे या सात-आठ दशकांचा काय पाड लागावा? पण, त्या नितळ गाण्यात मन हरवून गेलं. काननदेवींच्या आवाजातल्या 'ए चांद छुप ना जाना' या गाण्याची ओळ ऐकताच ऐंशी वर्षांचं वय पार करून गेलेल्या आईला तिचं किशोरवय आठवलं. सोलापूरच्या तिच्या मावशीचं घर आठवलं. तिथंच ऐकलं होतं तिनं ते गाणं. आता ते सोलापुरातलं घर नाही, ती माणसंही नाहीत. आठवणी मात्र कोमेजल्या नाहीत. निवेदनात अनंतराव म्हणतात, 'या गाण्यात एक ओळ काननची येते, तर एक जी-फ्लॅट क्लॅरिओनेटची. करता करता दोन्हींचा आवाज कमी होत जातो. या फेडआऊटनं मी आजही अस्वस्थ होतो.'

मला मात्र या गाण्यानं आईला झालेला हर्ष आणि फेडआउटची अस्वस्थता दोन्ही सुखावून जाते. 'मोहभरा मन फूल कमल का' ही कुठल्याशा गीतातली ओळ मनात अलगद उमलत जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाले चांदणे मराठी

$
0
0

ग. दि. माडगूळकर हे कवीचं नाव ठाऊक होण्याआधी त्यांच्या कविता ओठांवर गाणी होऊन खेळू लागल्या होत्या. आमच्या पाठ्यपुस्तकातल्या पानांवर त्या वेळी त्या नव्हत्या; पण जीवनात हरघडी भेटत होत्या. पुढे तर पानोपानी गदिमांची गाणी लगडली. आंब्याच्या वनात नाचणाऱ्या मोराचा पिसारा गाण्यातून फुललेला पाहिला. साठ वर्षांपूर्वीच्या गाण्यातली चांदोबाची गाडी, हरणांची जोडी आणि गुलाबाचं रान आजही खरं भासतं. 'आज कुणीतरी यावे'ची साद टवटवीत आहे. गदिमांच्या काव्याचं चैत्रबन माझ्याकडे असलेल्या छोटेखानी अवघ्या साठ पानांच्या पुस्तकात बंदिस्त आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे 'गीतयात्री गदिमा'. चित्रपट संगीताचे एक अधिकारी व लेखक मधू पोतदार यांचं हे पुस्तक म्हणजे संपूर्ण गदिमा चरित्राचा ओघवत्या भाषेतला आलेख होय. यात गाण्यांच्या खुणा आहेत. आठवणी आहेत. सुंदर प्रेमगीतं, लावण्या, बालगीतं, गीतरामायण, गीतगोपाल, कथा, पटकथा, संवाद आहेत. माडगूळ, औंध, कोल्हापूर, मुंबई, पुणे आणि त्यांची पंचवटी आहे. सर्व लहानशा पुस्तकात सामावलेलं आहे. गदिमांच्या जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंतचा प्रवास आहे. पहिली कविता आहे आणि शेवटचे शब्दही.

त्यांच्या बालसृष्टीतली ही कविता भेटते,

बिनभिंतीची उघडी शाळा

लाखो येथले गुरू

झाडे, वेली, पशू, पाखरे

यांसी गोष्टी करू

अजरामर 'जोगिया' भेटते,

कोन्यात झोपली सतार, सरला रंग

पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग.

तर अशी लावण्यवतीही भेटते,

सावळी तरी तू गोऱ्याहुन गोमटी गं

पट्ट्यात चांदीच्या कशी बसविशी कटी गं...

गदिमांच्या विशाल कविता सृष्टीतल्या वेचक वेधक ओळी आहेत.

पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या

या जीवनात काव्ये, काव्यात जीवनी या

गंधात धुंद वारा, वाऱ्यात गंध नाचे

डोळ्यात वाच माझ्या, तू गीत भावनांचे...

गदिमांचा अद्भुत असा गीत, साहित्याचा प्रवास या छोटेखानी पुस्तकात पोतदारांनी ओंजळीत पकडला आहे. तो सर्वच सांगण्याचा मोह होतो. त्यात मराठी वाङ्मयातील रामायणावरील श्रेष्ठ ठरलेल्या गीत रामायणाच्या अभूतपूर्व यशाबद्दल खुद्द गदिमांनी व्यक्त केलेली भावना अनुभवण्यासारखी आहे.

देववाणीतले ओज, शीतळले माझ्या ओठी

वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी...

आपल्यावर आईच्या तोंडून ऐकलेली ओवी आणि सर्व भाषेची जननी असलेल्या संस्कृतचे संस्कार आहेत, हे कृतज्ञतेनं सांगताना ते म्हणतात,

मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड...

या विलक्षण जीवनाचे चरण काहीशा अकालीच पडलेल्या दुर्धर रोगाच्या प्रहारानं थांबलं. ७७ सालच्या 'दीपावली' दिवाळी अंकातल्या लेखात गदिमा लिहितात, 'मला दिसला तो कालपुरुष. ठार काळा. त्या अंधाराला कसलाही अवयव नव्हता. माझा मीच त्याला ओळखून ओरडलो, 'हॅलो मि. डेथ.'

१५ डिसेंबर १९७७ला गदिमांची 'पंचवटी'तून महायात्रा निघाली. मृत्यूच्या अंधाराला भेदून त्यांची गीतयात्रा मात्र अखंड चाललेली आहे. 'बुगडी माझी सांडली गं'सारखी अस्सल लावणी आहे. 'मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे'सारखं अलौकीक गीत आहे. 'दिवसामागून दिवस चालले'सारखं आर्त प्रतीक्षागीत आहे. जोवर मराठी माणसाचं काळीज या गीतानं धडधडतं, तो पर्यंत गदिमांच्या काव्यसृष्टीचं चैत्रबन घमघमत राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाण्याने भरली राने..

$
0
0

>> सुलभा तेरणीकर

आवाज कोरून ठेवण्याची कला थॉमल अल्वा एडिसन यानं २९ नोव्हेंबर १८७७ या दिवशी जगासमोर आणली आणि या विज्ञान शोधानं अवघं मानवी जीवनच पूर्णपणे बदललं. हे आवाज कोरण्याचं मशीन जेव्हा साहेब भारतात घेऊन आला, तेव्हा या अद़्भुत ध्वनिमुद्रण कलेचं सार्थकच झालं, असं त्याला वाटलं; कारण या देशात संगीत रोमारोमांत, अणुरेणूंमध्ये भरून राहिलेलं त्याला आढळलं. इतकं वैविध्य किती साठवू, असं त्याला झालं असल्यास नवल नाही. ध्वनिमुद्रणाच्या आरंभीच्या काळात पशू, पक्षी, प्राणी, वेगवेगळ्या बोली, वाद्यं ध्वनिबद्ध झालेले आहेत. जन्मापासून प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक ऋतूत गायची परंपरा इथे आहे.

इथं कोण गात नव्हतं? सगळेच तर गात होते! स्त्रिया दळता कांडता गातात, मुली खेळताना, झोके घेताना गातात, नावाडी, शेतकरी, कष्टकरी गातात. मंदिरात, सणासुदीला, लावणी-कापणीच्या वेळी, धान्य घरी आणताना गातात. ऋषीमुनींनी, विद्वानांनी अनेक प्रयोगांती सिद्ध केलेला सामवेद इथे आहे. त्यांनी निसर्गातले नाद शोधून संगीतातलं एक परिपूर्ण शास्त्रच केलं आहे. हजारो भावभावनांचे सारे रसभाव त्यात भरलेले आहेत. इथं वाद्यांचं तर संमेलन आहे. ध्वनिमुद्रण कलेनं या भूमीत अपूर्व असा उत्सवच साजरा केला. विसाव्या शतकाच्या आरंभापासून तो आज नित्य चालला आहे.

ध्वनिमुद्रित संगीत वयाची, काळाची बंधनं दूर सारून स्मरणरंजनाचा निष्कलंक आनंद देत राहिलं आहे. त्या-त्या काळातील गाणी ऐकायला आली, की जणू त्या काळात जायला होतं! काळाच्या यंत्रात बसून भूतकाळात गेल्यासारखं होतं! त्या-त्या वेळचा काळ, रंग, गंध यांसह गाणी समोर येत राहतात आणि आनंद देत राहतात.

असं असलं, तरी या देशातलं विविधतेनं नटलेलं संगीत आज या तंत्रानं वेठीस धरलं आहे आणि या कोलाहलात हरवून गेलंय असं वाटतं. संगीतावर तंत्रानं मात केल्यासारखी स्थिती आहे. त्यामध्ये मूळ गाणंच गायब झालं आहे. आपल्या आठवणीची तार छेडणारं एखादं कोवळं गाणं आज खरं तर अस्तित्वात आहे, जिवंत आहे; पण ते मिळणार कुठे, असा प्रश्न येतो. ते कदाचित एका बोटाच्या इशाऱ्यावरही मिळेल; पण या महाजालात कुठे सापडेल? कदाचित् ते ओंजळीत येईलही; पण निःशब्दतेची आठवण करून देणारं संगीत कुठे ऐकावं? झपाट्यानं पुढे चाललेल्या काळाचं बोट खरं तर एखाद्या गाण्यानं धरता येईल का, असं वाटतं.

बालकवींच्या शब्दात, कवितेच्या पुस्तकात बंदिस्त झालेला 'निर्झर' मग मनाला साद घालतो.

पर्वत हा, ही दरी दरी

तव गीते भरली सारी

गाण्याने भरली राने

वर खाली गाणे गाणे...

गिरीशिखरं, वनमालांवरून उड्या घेत, लतावेलींशी खेळ करत, हिरवाळीत लपतछपत जाणाऱ्या पाचूची हिरवी रानं पार करून जाणाऱ्या निर्झराचं गाणं जसं हरवून गेलं आहे, तसंच मानवी कंठातलं मंजुळ गाणं देखील. सळसळती पिवळी शेतं, ताल देणारे बालतरू आणि दिव्य संगीतानं अवघं विश्व भारून टाकणारा बालकवींचा निर्झर पुन्हा खळाळून वाहायला हवा. तसं घडलं, तर सृष्टीची सतार झंकारून उठेल आणि आपल्या हृदयातील गीतंही!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काशा भ्यावे कारणे?

$
0
0

>> प्रा. डॉ. यशवंत पाटणे

आई लेकारची घेते ती काळ​जी. तीच बाब डॉक्टर व पेशंटची. लेकराला परीक्षेची व पेशंटला जीवाची वाटते, ती भीती. काळजी घेतली जाते, तर भीती बाळगली जाते. जी गोष्ट घ्यायची ती आपल्यापासून दूर असते, तर जी बाळगायची ती जवळ असते. अनेकवेळा डॉक्टर, पेशंटला 'भिण्याचे कारण नाही' असे सांगून धीर देतात, उपचार करतात. वास्तविक, आधी भीती बाळगणारा पेशंट, नंतर स्वतःच काळजी घेत ठणठणीत होतो. हीच बाब जीवनाला लागू पडते. कोणीतरी सुरवातीला आपली काळजी घेते, नंतर ती स्वतःला घ्यावी लागते. निष्काळजी माणसे कोणावर तरी अवलंबून असतात. पण काळजीचे काम दुसऱ्यावर सोपवून निर्धास्त राहणे, रास्त आहे काय?

जसे, एका आटपाटनगरीतील लोकांना काळजी करण्याच्या सवयीने इतके बेजार केले की, त्याची राजाला काळजी वाटू लागली. सर्वांना काळजीचा आजार जडला. शेवटी, प्रधानाने उपाय सुचविला, नगराची काळजी करायला स्वतंत्र व्यक्ती नेमायचे ठरले, मोठ्या पगाराच्या हमीवर, एका गरीबाला नेमले. त्याची नोकरी थोडे दिवस टिकली. कधीही मोठी रक्कम न पाहिलेला तो माणूस, पगार झाल्यावर भलताच खूष झाला. बायकोला म्हणाला, 'हे बघ पैसेच पैसे. आता मला कशाची काळजी करण्याचे कारण नाही.' नेमके हेच बोलणे, त्याची नोकरी जाण्याचे कारण झाले. सत्य एवढेच की, एखाद्याने सतत दुसऱ्याची काळजी वाहणं, हे दोघांसाठीही हानिकारक असते.

माणूस परावलंबी प्राणी आहे. पण भीती ही स्वावलंबी आहे. भीती स्वाभाविक असते, तशी ती मानसिक दुर्बलतेतून जन्माला येते. एखाद्या विषयाची ​निराधार, अप्रमाण भीती बाळगणे, हा मानसिक आजार असतो. बालपणातील एखाद्या आघातामुळेही भयगंड निर्माण होतो, तो कायमचा टिकतो. खोल विहिरीतील तळाचे पाणी सगळेच सहजतेने पाहू शकत नाहीत. स्वरक्षणासाठी सावध असणे शहाणपणाचे लक्षण असते. विहिरीचा कठडा कमकुवत असेल तर धाडसाने पुढे होवून पाणी पाहणाऱ्याला निर्भय म्हणता येत नाही, तो वेडेपणा असतो. एखादे धाडस समाजोपयोगी असेल तर त्याचे कौतुक होऊ शकते.

काळजीच्या पोटात असणारी भीती नैसर्गिक, आवश्यक असते. पण काळजीच्या आहारी जावू नये. काळजीग्रस्त माणूस संकटाशी सामना करू शकत नाही. काही वेळा भीती दाखवून दुसऱ्यावर वचक ठेवण्याची वृत्ती दिसते. काही शिक्षक भिंतीवर वेताची छडी टाकून वर्ग नियंत्रणात ठेवू पाहतात. काही पालकांची इच्छा असते, आपल्यासमोर मुलांनी भिवून रहावे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्यासमोर भिणारी व्यक्ती, आपल्या मागे तिरस्कार करण्याची शक्यता असते. भीती व तिरस्कार एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. शिक्षक वा पालकांनी मुलांच्या मनात जिव्हाळा, प्रेम निर्माण केले तर चुकीची गोष्ट करताना मुलांना आदरापोटी भीती वाटते. मुलांना कायमची धास्ती बसेल अशी भीती दाखवण्यापेक्षा, त्यांना आधार वाटेल अशी कृती केली तर ती निर्भय व क्रियाशील होतील. भयमुक्त माणसाचे आयुष्य आनंदी असते. त्यासाठी ज्ञानोबांना अभिप्रेत 'हृदयाहृदय एक' झाले पाहिजे. तुकोबा म्हणतात, 'भयाची तो आम्हा चित्ती। राहो खंत शकेना। स​मर्पिलो जीवे भावे। काशा भ्यावे कारणे।' या संदर्भात प्रसंग पाहा...

एक विमान हवेत हेलकावे खावू लागले. प्रवासी भयभीत झाले. एक छोटी मुलगी मात्र निश्चिंत होती. शेवटी विमान सुरक्षित लँड झाले. एकाने त्या मुलीला विचारले, 'तू इतकी शांत कशी? तुला भीती नाही का वाटली?' ती सहज म्हणाली, 'मला खात्री होती, आपण सुरक्षित उतरणार.. कारण... विमानाचे वैमानिक माझे बाबा आहेत.' 'समर्पिलो जीवे भावे' यालाच म्हणतात, अशा दृढ विश्वासातून चित्ताची निर्भयता निर्माण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभंग नाते

$
0
0

माणूस जन्माला एकटा येतो, पण नात्याने तो अनेकांशी बांधला जातो. भक्ताचे ईश्वराशी, लेकराचे आईशी, संसारिकाचे कुटुंबाशी, नेत्याचे जनतेशी, माणसाचे मित्रांशी जे नाते निर्माण होते, ते माणूस किती निष्ठेने जपतो, त्यावर नात्याचे जिवंतपण अवलंबून असते. प्रेमाचे रूपांतर भक्तीत झाले की, मग तेच प्रेम शक्ती बनते. भक्ती भोळी भाबडी नसावी. त्यात देवघेव नसावी. भक्तीत शुद्ध समर्पणभाव असावा. जसा निष्ठावंत वारकऱ्याच्या मनात विठ्ठलाविषयी असतो.

लेकराला जशी एकच आई, तशी वारकऱ्याला एकच माउली, एकच देव, तो म्हणजे विठ्ठल. आषाढी कार्तिकीत त्या पंढरीच्या देवाला भेटण्यासाठी जीव कासावीस होतो. पुष्कळ दिवस न भेटलेल्या आईच्या भेटीसाठी लेकरू जसं उतावीळ होतं, तीच भावना वारकऱ्याची, 'भेटीची आवडी उतावीळ मन। लागलेसे ध्यान जीवी जीवा।'

धनासाठी उतावीळ होणारी माणसं पदोपदी दिसतात. पण पांडुरंगाच्या अलिंगणासाठी तळमळणारी पावले पंढरीच्या वाटेवर भेटतात. या पावलांना ओढ विठ्ठल भेटीची असते. 'भेटोनिया बोले आवडीचे गूज। आनंदे भोज जेवू संगे।' ही त्यांची आस असते. एकमेकांच्या सहवासात भजन आणि भोजन करण्यातला सात्विक आनंद वारीतील मंडळी मनसोक्त घेतात. वय विसरून टाळ मृंदगाच्या तालात तल्लीन होतात. रिंगण धरतात. झिम्मा फुगडी खेळतात. 'भेटी लागी जीवा' म्हणत पुढे जातात. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता, 'ग्यानबा तुकाराम' चा नामजागर करतात. चंद्रभागेच्या दिशेने जाणारी ही दिंडी म्हणजे भक्तिगंगा. ती शरीर, आत्मा आणि मन यांना पावन करते. वारीमध्ये शरीर थकते पण मन उल्हासित होते.

वारकरी संप्रदाय हा मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह. धार्मिक जीवनाच्या कक्षेत राहून अनेक सामाजिक चळवळींना जीवनरस पुरविण्याचे मौलिक कार्य या संप्रदायाने केले. वारी हे त्यांचे आध्यात्मिक साधन. आध्यात्मिक लोकशाहीचे विराट दर्शन घडविणाऱ्या वारीतील, संतांचे ओवी अभंग हे त्यांचे चैतन्यमंत्र. संत हे एकान्तात व लोकान्तात रमले. एकान्ती स्फुरलेल्या ओवी अभंगांची अभिव्यक्ती लोकान्तात झाली. संत सावता माळी हे तर मळ्यात रमले. त्यांना 'कांदा, मुळा, भाजी' मध्ये विठ्ठलाची प्रचीती आली. आपल्या दैनंदिन कर्तव्याकडे पाठ न फिरवता कर्मात रंगलेला हा कर्मयोगी संत होता. संत गोरा कुंभार याच पंक्तीतले. त्यांनी विठ्ठलाला आळविले. मनाच्या विटेवर विठ्ठलाला उभे करून, राबत्या परिसराला पंढरीचे वैभव दिले. ज्यांना मनाच्या मळ्यातील लोभ, द्वेष, अहंकाराचे तण उपटून, कर्म करीत विठ्ठलाशी नाते जोडता येते, त्यांनाच संत सावता व संत गोरा यांच्या पंक्तीत बसता येते. 'विवेक दर्पण आयना' दाखविणारे संत सेनामहाराज, 'देह बागेसरी जाणे। अंतरात्मा नाम सोने' म्हणणारे संत नरहरी सोनार हे संत समाजाचा तोल सावरण्यासाठी निरामय जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात. त्यांचे विठ्ठल आणि व्यवसायातील अद्वैत नाते, त्यांची भावश्रीमंती सांगते. त्यांना रूपयांच्या राशीचे, माणिक मोत्यांच्या ढिगाचे आकर्षण नव्हते. याउलट, आज भरजरी पोषाखातील संतांनी धर्माचा बाजार मांडला आहे. त्यांचा डामडौल मांडताना कुसुमाग्रज म्हणतात, 'यांच्या लंगोटीला झालर मोत्याची। चिलीम सोन्याची' संतत्वाचे सोंग घेऊन तुंबडी भरणाऱ्या ढोंगी साधूंचा समाचार घेताना तुकोबा म्हणतात, 'अंगी लावुनिया राख। डोळे झाकुनी करिती पाप'

वास्तविक, मानवाच्या भल्यासाठी समतेच, ममतेचा, दया, क्षमा, शांतीचा सूर आळविणारे संत हे संस्कृती संवर्धक असतात. त्यांच्या तप चिंतनातून चंदनाचा गंध असणाऱ्या अमृतधारा बरसतात. त्यावर पिढ्यान‍पिढ्यांचे सांस्कृतिक पोषण होते. अशा मातृहृदयी संताचे एकच मागणे असते, 'हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।' हेच खरे अभंग नाते असते.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 1476 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>